Monday, November 17, 2008

अरुण देशपांडे आणि Sustainable Development - भाग १

अरूण देशपांडे यांच्या 'आमी तुमच्या पिशवीत मावतच न्हायी' पुस्तकातील एका लेखाचा थोडासा भाग.

****************

"
तुम्ही धरणांच्या एवढे विरोधात का आहात? आता हेच बघा, आम्ही कोयनेच्या कोकणातील पाचव्या टप्प्यात वीज निर्माण करून समुद्रात वाया जाणारे पाणी पुन्हा दुष्काळग्रस्त देशावर (?) आणणार आहोत." एक तडफदार आय.ए.एस. अधिकारी तारे तोडत होते.

नैसर्गिकरित्या सूर्यशक्तीने खारं पाणी 'डिस्टिल्ड' होऊन गोड्या स्वरूपात मिळाल्यानंतर (उर्ध्वपतनासाठी लागलेली ऊर्जा मोजावी) प्रचंड ऊर्जा खर्च करून हजारो धरणग्रस्तांना धुळीला मिळवून,हजारो हेक्टर बारमाही हिरवेगार, घनदाट जंगल पाण्यात कायमचे बुडवून (त्या जंगलाचे दरवर्षी निरंतरपणे हेक्टरी २० टन जळाऊ लाकूड दिलं असतं ती ऊर्जा मोजावीच) बांधलेल्या धरणात साठवायचं. त्यात अत्यंत मौल्यवान, दुर्मिळ गोड्या पाण्यासाठी पूर्वेचे अख्खे दख्खनचे पठार दुष्काळात तडफडत असताना ते गोडे पाणी पुन्हा पश्चिमेच्या त्याच खार्‍या पाण्याच्या समुद्रात फेकून द्यायचं आणि पडताना मिळणारी ती ऊर्जा (!) विजेत रूपांतरीत करायची व ती महागडी वीज अत्यंत अकार्यक्षमतेने (५ टक्के कार्यक्षमता) वापरायची. याला बौद्धिक दिवाळखोरी म्हणतात. उदा. कोयना प्रकल्प, मुळशी ,पवना, टाटा इलेक्ट्रिक कंपनीचे प्रकल्प इ. ही दिवाळखोरी कमी पडली की काय म्हणून त्या प्रचंड जलाशयांच्या तळात प्रचंड भोके पाडून उरलेसुरले 'डिस्टिल्ड वॉटर' खार्‍या समुद्रात फेकून द्यायचे. त्याला लेक टॅपिंगचे महान तांत्रिक यश म्हणून समारंभपूर्वक आपल्याच टिपर्‍या बडवीत सगळ्यांनी नाचायचे. याला काय म्हणावे? हे सर्व वाचल्यानंतर सर्व मि. प्रॅक्टिकल मंडळी त्या आडदांड मिस्त्रीप्रमाणे अंगावर धावून येणारच आहेत, पण काय करणार? 'सब कुछ दिखता है| बादशहा नंगा है' असे जोरात ओरडून कोणाला तरी सांगावेच लागते.

एखादा साधा गोबर गॅस प्लांट काय किंवा अणुऊर्जा प्रकल्प काय, त्यांचं ऊर्जा आणि पर्यावरणीय ताळेबंद मांडावेच लागणार आहेत. त्यावेळी आडदांड,बंदबुद्धी, मि. प्रॅक्टिकल मंडळी ताळेबंद मागणार्या आणि मांडणार्यांच्या अंगावर धावून जाणार आहेतच. (सध्याचा गोबरगॅस प्लांट ऊर्जा दिवाळखोर आहे. तो बनवायला लागलेली ऊर्जा त्याच्या आयुष्यात परत मिळत नाही. तीच गोष्ट सौरघटाची आहे.)

शेती म्हणजे मानवी बुद्धिमत्ता ज्ञान वापरून वाढवलेल्या वनस्पतींनी केलेले प्रकाशसंश्लेषण (कल्चर्ड फोटोसिंथेसिस) शेतीत अंतराळातून रोज येणारी , मोफत मिळणारी सौर ऊर्जा वापरून वनस्पतीद्वारा हजारे प्रकारचे पदार्थ तयार केले जातात. ही शेती करीत असताना काही प्रमाणात पूर्वी साठवलेली सौरऊर्जा वापरावी लागते. उदा. माणसे,पशू यांची स्नायूशक्ती. पण ती तयार होणार्या अन्नशक्तीपेक्षा पुष्कळच कमी लागते. म्हणजे खरं निरंतर चालणारं यंत्र म्हणजे शेतीच. (आणि जंगलेसुद्धा) ते यंत्र निरंतरपणे चिरंजीवी पद्धतीने (सस्टेनेबल) चालवायचं म्हणजे मानवी बुद्धिमत्तेचा कस लागतो. ते सर्व सोडून देऊन महामूर रासायनिक खतं,पर्यावरणीय संतुलनाचा विनाश करणारी किडनाशकं, जमिनींचा सत्यानाश करणारी बेजबाबदार सिंचन व्यवस्था,खोल खोल भोकं पाडून प्रचंड ऊर्जा खर्चून वर उपसलेले पाणी (३०० फुटांचे बोअर म्हणजे तीस मजली इमारतीच्या गच्चीवर पाणी नेऊन शेती करण्याइतके हास्यास्पद आहे.) . वापरून केलेली आधुनिक शेती म्हणजे बौद्धिक दिवाळखोरीच आहे. निरंतरपणे फुकट मिळणार्या सौरशक्तीचे एका अन्न कॅलरीत रूपांतर करण्यासाठी पाच पेट्रोकॅलरी आणि ती एक अन्नकॅलरी लांब लांब अंतरावरील बांडगुळी शहरी महानगरी ग्राहकांच्या तोंडापर्यंत नेण्यासाठी आणखी वीस-पंचवीस पेट्रोकॅलरीज खर्चायच्या. एवढेच नाही तर त्या सगळ्याला हरितक्रांती, धवलक्रांती आणि प्रगती ,स्वावलंबन म्हणून नाचायचे. या सगळ्या क्रांत्या अरबस्तानातून येणार्या तिथे साठविल्या गेलेल्या कधीतरी संपणार्या लाखो वर्षापूर्वीच्या सौरऊर्जेवर म्हणजे क्रूड ऑइलवर अवलंबून आहेत बरं! या क्रांत्यांचेही ऑडिट करावेच लागणार आहे. त्यावेळीही ही आडदांड,आडमुठी 'ज्ञानदांडगी' मि. प्रॅक्टिकल मंडळी अंगावर येणारच आहेत.

3 Comments:

Blogger HAREKRISHNAJI said...

Absoutly write

1:03 PM  
Blogger आजानुकर्ण said...

अरुण देशपांडेंबद्दल मीपण अवचटांच्याच पुस्तकात वाचलं होतं. त्यांनी पुस्तकं लिहिली आहेत याची कल्पना नव्हती. इथे लिहिल्याबद्दल धन्यवाद

6:44 PM  
Blogger mannab said...

I also would like to know Arun Deshpande's all other books.Thanks. Mangesh

7:45 AM  

Post a Comment

Links to this post:

Create a Link

<< Home