Friday, March 23, 2007

प्रायोगिक रंगभूमीविषयी थोडंसं -

ओंकार गोवर्धन (उर्फ गोव्या) हा माझा मित्र. मराठी रंगभूमीवर काम करणारा एक कलाकार. गेली अनेक वर्षं अनेक नाटकांतून तो स्वत: काम करतो आहे आणि अनेक संस्थांशी निगडित आहे. त्याच्यामुळे अनेक प्रायोगिक नाटकं पाहण्याचा योग येतो. गेल्या काही दिवसांत महाराष्ट्र कल्चरल सेंटरचे एका 'छोट्याश्या सुट्टीत' तर आसक्त पुणे या संस्थेची 'फ्रिजमधे ठेवलेले प्रेम','तू' आणि 'पूर्णविराम' ही नाटके पाहिली. यातील 'एका छोट्याश्या सुट्टीत' हे नाटक फारच आवडलं. नाटकाची संकल्पना वेगळी आणि छान आहे. 'फ्रिजमधे ठेवलेलं प्रेम' आणि 'तू' ही नाटकं मात्र फारच क्लिष्ट वाटली. लेखकाला नक्की काय सांगायचंय ते नीट कळतंच नाही. 'पूर्णविराम' चांगलं वाटलं पण त्यातही काही गोष्टी अर्धवट ठेवल्यासारख्या वाटल्या आणि थोडी निराशाच झाली. मुळात जगातलं कितीही मोठं तत्त्व हे अगदी सहज आणि सोप्या प्रकारे दाखवता येतं यावर माझा विश्वास आहे. गोष्टी उगाचच अवघड करून सांगितल्या तर त्या नकोशा वाटायला लागतात.

माझं मत मी गोव्याला स्पष्टपणे सांगितलं. त्यावर तो म्हणाला, " व्यावसायिक रंगभूमीवर एखादं नाटक करताना खूप मर्यादा येतात. तिथे लोकांना सगळं समजेल असं छान छान असंच दाखवावं लागतं. प्रायोगिक रंगभूमी ही आपल्यासाठी आहे. आपल्याला हवं तसं वेगळं काहीतरी करायची संधी प्रायोगिक नाटकांतूनच मिळते. शेवटी अशी नाटकं करणं हा देखील एक प्रयोगच आहे. यातून काहीतरी वेगळं लोकांना मिळावं हाच प्रयत्न आहे. ही नाटकं आवडो अगर न आवडो आपण ती पाहायला हवीत."

त्याचं हे म्हणणं मात्र मला पटतं. या नाटकांमधील वेगळेपण जाणवत राहतं. सुंदर अभिनय हा त्यातला एक मुद्दा. दिग्दर्शनातही एक प्रकारचं नाविन्य आहे. ही नाटकं पाहताना आपण काहीतरी वेगळं पूर्वी न पाहिलेलं पाहतोय असं वाटत राहतं.
रंगभूमीसाठी ही मंडळी खरोखर खूप कष्ट घेतात आणि त्याबद्दल मला त्यांचा खरोखर आदर वाटतो. अशाच प्रयत्नांतूनच 'माकडाच्या हाती शॅम्पेन' सारखं वेगळं आणि चांगलं प्रायोगिक नाटक व्यावसायिक रंगभूमीवर येतं. छोट्याश्या सुट्टीत सारखी नाटकं इथेच पाहायला मिळतात.

गोव्या म्हणतो तसं आपण स्वत: ही नाटकं निदान पाहायला हवीत. दूरदर्शनवरील फालतू मालिकांत रमणाऱ्या घरातील मंडळींना कधीतरी रंगमंचाकडे वळवलं पाहिजे. शाहरूख खान हा चांगला अभिनय करतो, इतपतच ज्यांची अभिनयाची अनुभूती मर्यादित राहिली आहे, अशा आपल्या मित्रमंडळींना आपण अभिनय म्हणजे काय हे दाखवण्यासाठी अशा नाटकांना घेऊन जाऊ शकता. :)
प्रायोगिक रंगभूमी टिकवणे ही रसिकांची जबाबदारी आहे. पण त्याचबरोबर नाटककारांनी, दिग्दर्शकांनी उगीचच काहीतरी क्लिष्ट दाखवून आपण काहीतरी जगावेगळं करतोय या भ्रमात राहू नये. मुळात प्रेक्षक आणि नाटककार-दिग्दर्शक यांमधे मोकळेपणाने संवाद व्हायला हवा. नाटक आवडलं , न आवडलं याबाबत मोकळेपणाने चर्चा व्हायला हवी. काहीतरी वेगळं पाहण्याची इच्छा असलेले माझ्यासारखे रसिक आणि काहीतरी वेगळं देण्याची इच्छा असलेले नाटककार यांमधे फार अंतर असता कामा नये. :) प्रायोगिक रंगभूमी टिकवण्यासाठी या गोष्टींची खूप गरज आहे, हे माझं प्रामाणिक मत.

5 Comments:

Blogger yogesh said...

मस्त रे.
मागच्या महिन्यात पुण्यात झालेला चित्रपट महोत्सव बघितलास का? खूप मस्त पिच्चर दाखवले.

6:11 PM  
Blogger प्रिया said...

चांगलं लिहीलंयस रे! 'सुट्टीत' खरंच खूप छान नाटक आहे. 'माकडाच्या हाती...' चे आता व्यावसायिक प्रयोग पण होतायत ना म्हणे? आपण अशी नाटकं अधिकाधिक पहायला हवीत, खरंय!

3:41 AM  
Blogger कोहम said...

mitra....hya sagalya ekankika/ deerghanka kuthe miltil sangushakatos ka? aamhi ithe australia madhe vegali nataka karaycha prayatna karatoy response chaan milala pahilya don ekankikanna, pan maza tithala touch sutalyamule navi changli nataka konati hech mahit nasta...

7:59 AM  
Blogger Kaustubh said...

कोहम,

तू नाटकांचे Videos मिळतील का, असं विचारतोयंस का?
Videos मिळणं अवघड आहे रे.

Scripts चं म्हणत असशील तर मी माझ्या मित्राला विचारू शकतो.

5:41 PM  
Blogger MJ said...

Hello Kaustubh,
We perform yearly One Act Play in USA. This year we did "Bhint" by Satish Aalekar and "Mahabharatche UttarRamayan" by P.L. Mayekar. Looking for comedy ekankika. If you know any please email at mdratnagiri@hotmail.com

8:28 AM  

Post a Comment

Links to this post:

Create a Link

<< Home