कोश
पूर्वी मला Internet, Voice Chatting वगैरे गोष्टींचं खरंच कौतुक होतं. काय ते भारी internet, जगात कुठेही असणाऱ्या कोणाही माणसाशी आपण किती सहज आणि फुकट बोलू शकतो असं मला खरोखर वाटायचं. गंमत म्हणजे आज माझे एवढे मित्र अमेरिकेत आहेत, एवढी सगळी साधनं जवळ आहेत, पण एकही जण नीट संपर्कात नाही. प्रामाणिकपणे सांगायचं तर बोलण्यासाठी Common असे विषयच नाहीयेत. ‘मजेत आहे, चालू आहे’ अशा गप्पा मारून मारून मारणार किती?
हे एक उदाहरण म्हणून दिलं. पण ही परिस्थिती मला सगळीकडेच दिसते. आजकाल आमच्या गप्पा रंगण्यासाठी फेडरर-नदाल फायनलची वाट पहावी लागते, सचिनला सेंचुरी मारावी लागते किंवा दुर्दैवाची गोष्ट म्हणजे २६/११सारखं काहीतरी घडावं लागतं. थोडे दिवस प्रत्येक जण तावातावाने बोलतो, मग पुन्हा सगळं शांत. मग प्रत्येकजण कोणत्यातरी वेगळ्याच गोष्टीत आनंद शोधतो. कोणीतरी उगाचच I-Phone घेतो, कोणीतरी नवीन गाडी घेतो, कोणी अमेरिकेत आहोत म्हणून उगाचच इकडे-तिकडे भटकून फोटो पाठवतो, कोणी Friends पाहण्य़ात आयुष्याचं सार्थक मानतो. कुठे काय चांगलं खायला मिळतं यावरून रंगणाऱ्या गप्पाही अशाच. बोलायला विषयच नाहीत दुसरे. मग खाण्यावर बोला. एका वाक्यात बोलायचं झालं तर, ‘आपल्या सगळ्यांचंच आयुष्य खूप खूप जास्त आत्मकेंद्रित होत चाललंय’.
मी सहा महिने बार्सिलोनात होतो. प्रामाणिकपणे सांगायचं तर तिथलं काम मला खूप आवडलं होतं. युरोपियन लोकांबरोबर रहात होतो. काही अनुभव फार वेगळे आणि चांगले होते. पण या सगळ्यांच्या पलिकडे जाऊन तिथला एकटेपणा आणि स्वत:च्याच कोशात गुरफटून घेण्याचा तो मार्ग आठवला की आजही अंगावर शहारे येतात. तिथल्या एकूणच वास्तव्याने मला सगळ्याच गोष्टींचा मुळापासून विचार करण्यास भाग पाडलं एवढं नक्की.
आता भारतात आहे पण परिस्थिती फारशी बदललेली नाहीये. मी आधी सांगितल्याप्रमाणे ही परिस्थिती थोड्याफार फरकाने सगळीकडे सारखीच आहे. पण निदान इथे विचार करण्यासाठी मोकळा वेळ आहे आणि धडपड करण्यासाठी तीन-चार मार्ग तरी आहेत. या कोशातून बाहेर पडू शकलोच तर जरा मोकळा श्वास घेऊ शकेन.
असो.
अरुण देशपांडे आणि Sustainable Development - भाग २
अनिल अवचटांच्या कार्यरत पुस्तकातून अरूण देशपांडेंची ओळख झाली. अरूण देशपांडे स्वतःएक अभियंता आणि हाडाचे संशोधक आहेत. साधारण प्रगती आणि विकासाच्या आपल्या ज्या काही (शहरी) संकल्पना असतात, त्या खरोखरच निरंतर (sustainable)
आहेत का, हा एक खूप मोठा प्रश्न आहे. या बाबतीत डोकं शांत ठेवून थोडासा जरी अभ्यास केला, की आपल्या पिढीसमोरील प्रचंड ऊर्जासंकट लगेचच लक्षात येतं. सोलापूरजवळ अंकोली या लहानश्या खेड्यात अरूण देशपांडेंनी शेतीच नव्हे तर एकूणच Sustainable Development या विषयावर केलेलं संशोधन आणि प्रयोग हा आश्चर्यांचा खजिना आहे. वरकरणी अरूण देशपांडे फार टोकाची भूमिका घेताहेत असं वाटतं,पण जेव्हा ते प्रत्येक गोष्टींची गणित मांडून आकडेवारी देतात तेव्हा आपण गप्प होतो.
मी सोलापूरचाच असल्याने या भागातील पाण्याचे दुर्भिक्ष्य मला चांगलंच माहित्येय. त्यामुळेच त्यांनी फुलवलेली शेती ही फार कौतुकास्पद गोष्ट आहे.या वर्षी ऑगस्टमधे खरं तर त्यांना भेटण्याची आणि त्यांचा प्रयोग परिवार पाहण्याची फार इच्छा होती, पण त्यावेळी ते स्वत:च भारतात नसल्याने जमलं नाही. पण त्यांचे सहकारी संजय म्हेत्रस यांना सोलापुरात भेटून त्यांच्याशी अगदी मोकळ्या गप्पा मारता आल्या. माझी त्यांच्या कामाशी जशी जशी ओळख होतेय, तसा तसा मी जास्त प्रभावित होतोय.
या गोष्टींचा अभ्यास करताना एक दुहेरी अस्वस्थता मात्र आहे. पहिली म्हणजे, इतकी वर्षं शिकूनही आपले व्यावहारिक ज्ञान शून्य आहे याची जाणीव होतेय. अशा विषयांवर कधीही विचार/चर्चा करण्याची वेळ येवो, आम्ही लोकं फक्त CCD मधे कॉफी पीत अकलेचे तारे तोडत असतो. 'मेधा पाटकर' आणि 'नर्मदा बचाव आंदोलन' वगैरे विषय निघाले, की प्रत्येकाला आपलं मत मांडायची एवढी घाई असते, की विचारू नका. बरं ही मतं मांडण्याआधीचा आमचा अभ्यास काय? तर इकडून तिकडून वाचलेलं काहीतरी अर्धवट आणि पूर्वी ऐकलेल्या असल्याच गप्पा.
अर्धवट शिक्षणातून येणारा हा आडमुठेपणा नकोसा होतोय आता.
दुसरी अस्वस्थता म्हणजे एकूणच संशोधन आणि काम याबद्दल असणार्
या आपल्या स्वतःच्याच संकल्पनांबाबत प्रश्नचिन्ह निर्माण होतंय. संशोधन, Ph.D. , काम या विषयांबाबत जेव्हा कधी आमच्या गप्पा होतात, तेव्हा भारतात राहायचं असेल तर या गोष्टी बाजूला ठेवा असाच चर्चेचा सूर निघतो. भारतात अडचणी आहेत,हे मी मान्य करतो, पण या अडचणींवर तोडगा काढून कौतुकास्पद काम करणारी लोकंही आहेत. गडचिरोलिचे डॉ. अभय बंग असोत, महाडचे डॉ. बावस्कर किंवा अरूण देशपांडे असोत. (या तिघांचीही ओळख अनिल अवचटांच्या कार्यरत पुस्तकातून होते) या लोकांचं काम पाहिलं की आपण संभ्रमात पडतो. त्यामुळे सगळ्याच संकल्पना तपासून पाहण्याची गरज निर्माण होतेय. हे काम केवळ चांगलं नाहीये तर ते कितीतरी मोठं आणि प्रभावी आहे. शिवाय असं काम करण्यासाठी भारताशिवाय वेगळी जागा आहे का, हा दुसरा मोठा प्रश्न आहे.
असो. या सगळ्याच प्रश्नांची उत्तरं लगेचच मिळणार नाहीत. पण त्या दृष्टीने मी वाचन/विचार करतोय यात समाधान आहे.
अरुण देशपांडे आणि Sustainable Development - भाग १
अरूण देशपांडे यांच्या 'आमी तुमच्या पिशवीत मावतच न्हायी' पुस्तकातील एका लेखाचा थोडासा भाग.
****************
"तुम्ही धरणांच्या एवढे विरोधात का आहात? आता हेच बघा, आम्ही कोयनेच्या कोकणातील पाचव्या टप्प्यात वीज निर्माण करून समुद्रात वाया जाणारे पाणी पुन्हा दुष्काळग्रस्त देशावर (?) आणणार आहोत." एक तडफदार आय.ए.एस. अधिकारी तारे तोडत होते.
नैसर्गिकरित्या सूर्यशक्तीने खारं पाणी 'डिस्टिल्ड' होऊन गोड्या स्वरूपात मिळाल्यानंतर (उर्ध्वपतनासाठी लागलेली ऊर्जा मोजावी) प्रचंड ऊर्जा खर्च करून हजारो धरणग्रस्तांना धुळीला मिळवून,हजारो हेक्टर बारमाही हिरवेगार, घनदाट जंगल पाण्यात कायमचे बुडवून (त्या जंगलाचे दरवर्षी निरंतरपणे हेक्टरी २० टन जळाऊ लाकूड दिलं असतं ती ऊर्जा मोजावीच) बांधलेल्या धरणात साठवायचं. त्यात अत्यंत मौल्यवान, दुर्मिळ गोड्या पाण्यासाठी पूर्वेचे अख्खे दख्खनचे पठार दुष्काळात तडफडत असताना ते गोडे पाणी पुन्हा पश्चिमेच्या त्याच खार्या पाण्याच्या समुद्रात फेकून द्यायचं आणि पडताना मिळणारी ती ऊर्जा (!) विजेत रूपांतरीत करायची व ती महागडी वीज अत्यंत अकार्यक्षमतेने (५ टक्के कार्यक्षमता) वापरायची. याला बौद्धिक दिवाळखोरी म्हणतात. उदा. कोयना प्रकल्प, मुळशी ,पवना, टाटा इलेक्ट्रिक कंपनीचे प्रकल्प इ. ही दिवाळखोरी कमी पडली की काय म्हणून त्या प्रचंड जलाशयांच्या तळात प्रचंड भोके पाडून उरलेसुरले 'डिस्टिल्ड वॉटर' खार्या समुद्रात फेकून द्यायचे. त्याला लेक टॅपिंगचे महान तांत्रिक यश म्हणून समारंभपूर्वक आपल्याच टिपर्या बडवीत सगळ्यांनी नाचायचे. याला काय म्हणावे? हे सर्व वाचल्यानंतर सर्व मि. प्रॅक्टिकल मंडळी त्या आडदांड मिस्त्रीप्रमाणे अंगावर धावून येणारच आहेत, पण काय करणार? 'सब कुछ दिखता है| बादशहा नंगा है' असे जोरात ओरडून कोणाला तरी सांगावेच लागते.
एखादा साधा गोबर गॅस प्लांट काय किंवा अणुऊर्जा प्रकल्प काय, त्यांचं ऊर्जा आणि पर्यावरणीय ताळेबंद मांडावेच लागणार आहेत. त्यावेळी आडदांड,बंदबुद्धी, मि. प्रॅक्टिकल मंडळी ताळेबंद मागणार्
या आणि मांडणार्
यांच्या अंगावर धावून जाणार आहेतच. (सध्याचा गोबरगॅस प्लांट ऊर्जा दिवाळखोर आहे. तो बनवायला लागलेली ऊर्जा त्याच्या आयुष्यात परत मिळत नाही. तीच गोष्ट सौरघटाची आहे.)
शेती म्हणजे मानवी बुद्धिमत्ता व ज्ञान वापरून वाढवलेल्या वनस्पतींनी केलेले प्रकाशसंश्लेषण (कल्चर्ड फोटोसिंथेसिस) शेतीत अंतराळातून रोज येणारी , मोफत मिळणारी सौर ऊर्जा वापरून वनस्पतीद्वारा हजारे प्रकारचे पदार्थ तयार केले जातात. ही शेती करीत असताना काही प्रमाणात पूर्वी साठवलेली सौरऊर्जा वापरावी लागते. उदा. माणसे,पशू यांची स्नायूशक्ती. पण ती तयार होणार्
या अन्नशक्तीपेक्षा पुष्कळच कमी लागते. म्हणजे खरं निरंतर चालणारं यंत्र म्हणजे शेतीच. (आणि जंगलेसुद्धा) ते यंत्र निरंतरपणे चिरंजीवी पद्धतीने (सस्टेनेबल) चालवायचं म्हणजे मानवी बुद्धिमत्तेचा कस लागतो. ते सर्व सोडून देऊन महामूर रासायनिक खतं,पर्यावरणीय संतुलनाचा विनाश करणारी किडनाशकं, जमिनींचा सत्यानाश करणारी बेजबाबदार सिंचन व्यवस्था,खोल खोल भोकं पाडून प्रचंड ऊर्जा खर्चून वर उपसलेले पाणी (३०० फुटांचे बोअर म्हणजे तीस मजली इमारतीच्या गच्चीवर पाणी नेऊन शेती करण्याइतके हास्यास्पद आहे.) इ. वापरून केलेली आधुनिक शेती म्हणजे बौद्धिक दिवाळखोरीच आहे. निरंतरपणे फुकट मिळणार्
या सौरशक्तीचे एका अन्न कॅलरीत रूपांतर करण्यासाठी पाच पेट्रोकॅलरी आणि ती एक अन्नकॅलरी लांब लांब अंतरावरील बांडगुळी शहरी व महानगरी ग्राहकांच्या तोंडापर्यंत नेण्यासाठी आणखी वीस-पंचवीस पेट्रोकॅलरीज खर्चायच्या. एवढेच नाही तर त्या सगळ्याला हरितक्रांती, धवलक्रांती आणि प्रगती ,
स्वावलंबन म्हणून नाचायचे. या सगळ्या क्रांत्या अरबस्तानातून येणार्
या व तिथे साठविल्या गेलेल्या व कधीतरी संपणार्
या लाखो वर्षापूर्वीच्या सौरऊर्जेवर म्हणजे क्रूड ऑइलवर अवलंबून आहेत बरं! या क्रांत्यांचेही ऑडिट करावेच लागणार आहे. त्यावेळीही ही आडदांड,आडमुठी 'ज्ञानदांडगी' मि. प्रॅक्टिकल मंडळी अंगावर येणारच आहेत.
प्रतिक्रिया
मी जे काही वाचतो, ऐकतो (संगीत), पाहतो (चित्रपट आणि बरंच काही) ते आवडल्यास ताबडतोब आजूबाजूच्या लोकांना सांगून मला मोकळं व्हायचं असतं. मग समोरच्याने ते त्याच्या सवडीने पहावं. त्याला ते आवडो अगर न आवडो हा त्याचा प्रश्न. पण प्रतिक्रियांची अपेक्षा नेहमीच असते. मला गुळमुळीत प्रतिक्रिया आवडतच नाहीत. उगाच आपलं 'आवडलं', 'छान आहे' असं समोरच्याने म्हटलं की ते वरवरचं वाटू लागतं. कदाचित तसं नसेलही पण आवडलेल्या गोष्टी व्यक्त करताना एक आवेग दिसायला हवा असं मला नेहमीच वाटत आलंय. आवडलं तर काय आवडलं हेही सांगता यायला हवं. कोणतीही गोष्ट जेव्हा आवडते तेव्हा त्यात एक समर्पणाची भावना असते. असायला हवी.
जी गोष्ट आवडण्याची तीच नावडण्याचीही. एखादी गोष्ट नसेल आवडली तर सांगण्यात संकोच नसावा. काय आवडलं नाही आणि का आवडलं नाही हे मोकळेपणानं सांगणंही खूप मोठी गोष्ट आहे. फार कमी जणांना हे समजतं. असो.
Echoes (Pink Floyd) ऐकताना एकीकडे माझं भान हरपत असतं, तर दुसरीकडे एका अपूर्णतेची जाणीव होत असते. आत्ता हा क्षण शेअर करायला कोणीतरी सोबत असायला हवं, ही जाणीव अस्वस्थ करत असते. Echoes ऐकून झाल्यावर परवा चारूने फोनच केला. त्याचं पहिलं वाक्य. "अरे काय ग्रेट प्रकार आहे हा." त्याची ही मन:स्थिती मी अगदी पूर्णपणे समजू शकतो. कारण मी त्यातूनच जात असतो. धनंजयची शास्त्रीय संगीताची आवड आणि त्याचा अभ्यास खूप मोठा आहे. मागे एकदा तो म्हणाला होता,"इतकं रस घेऊन शिकणारं आणि अभ्यास करणारं कोणी भेटत नाही रे. त्याचं वाईट वाटतं." त्याचं हे दु:ख मी नक्कीच समजू शकतो. हलकं मात्र करू शकत नाही. :(
माझ्या सुदैवाने या सगळ्या गोष्टी समजतील असे मित्र मला नक्कीच भेटले, किंवा जे भेटले तेच जवळचे झाले.
आपापल्या वाटा शोधत मित्र जेव्हा लांब जातात, तेव्हा वाचन, संगीत, चित्रपट हे सगळं चालूच असतं पण ते शेअर करता यावं असं आजूबाजूला कोणीच नसतं. समोर भेटेल त्याला आपण उत्साहाने सांगायला जावं आणि त्याने अशी गुळमुळीत प्रतिक्रिया दिली की मन हिरमुसतं. मन सावध होतं आणि गोष्टी इतरांबरोबर शेअर करणंच कमी होत जातं. आता यात चूक- बरोबर काय ते मला समजत नाही. पण माझं असं आहे खरं. शेवटी जे आवडतं ते इतरांना वाटणं किंवा वाटता येणं, हाच आयुष्यातला सर्वांत मोठा आनंद आहे, एवढंच मला कळतं. आणि त्यासाठीच तर हा ब्लॉग वगैरे प्रपंच.
संगीताविषयी थोडंसं
संगीता यांच्या ब्लॉगवरील संगीताविषयीचा हा लेख वाचून संगीताबद्दल आपणही थोडं लिहिलं पाहिजे असं वाटून गेलं. :) त्याचा एक प्रयत्न.
१९६० च्या दशकातील उत्तरार्धात इंग्लंड-अमेरिकेत Rock संगीत अगदी नावारूपाला आलं होतं, पण त्यात काही महत्त्वपूर्ण बदल होत होते. याच काळात Psychedelic Rock, Progressive Rock असे नवीन प्रकार उदयास आले. या काळात फार वेगळ्या प्रकारचं संगीत देऊन पूर्ण पाश्चिमात्य संगीतावर खूप प्रभाव पाडणाऱ्या Music Bands मधे इंग्लंड मधील Pink Floyd, Jethro Tull, Led Zeppelin तर अमेरिकेतील The Doors यांची नावं घेता येतील. या लोकांनी दिलेल्या संगीताचा मी प्रचंड फॅन आहे. Rock संगीतात पुढेही खूप बदल होत गेले. अलिकडच्या काळातील Hard Rock, Alternative Rock किंवा Heavy Metal, Death Metal हे प्रकार मला फारसे आवडत नाहीत. Rock संगीताची ओळख म्हणून बहुतेक वेळा नवशिके हे नवीन Rock संगीत ऐकतात आणि एकूणच Rock संगीताच्या बाबतीत त्यांच्या मनात एक पूर्ण चुकीची संकल्पना तयार होते. चांगलं काय आहे , काय ऐकलं पाहिजे हे सांगणारं कोणीतरी भेटणं फार गरजेचं असतं. असो.
Pink Floyd, Jethro Tull यांच्या संगीताने मला अक्षरश: वेड लावलंय. या Bandsची Compositions अत्यंत अवघड पण खूप प्रभावी आहेत. या संगीताची ओळख होण्यापूर्वी इतकं चांगलं आणि सरस Instrumental Music मी पूर्वी कधीच ऐकलं नव्हतं.
केवळ या Instrumental Music मुळे मला संगीताचा हा प्रकार इतका जवळचा वाटतो का? नाही. संगीतातील सहजपणा म्हणजे काय किंवा मला जे अपेक्षित आहे त्याबद्दल थोडसं बोलतो . खूप आनंदाच्या क्षणी, कधीतरी कंटाळलेल्या अवस्थेत, निराश असताना किंवा चिडलेल्या क्षणी जे संगीत तुमच्या भावना, मनातला गोंधळ किंवा विचार अचूकपणे reflect करू शकतं ते सहज.
Pink Floyd ग्रुप मधीलच अत्यंत जवळचा मित्र Syd Barrett ड्रग्जच्या आहारी जाऊन स्वत:च्या मनावरचं संतुलन हरवून बसला त्यावेळी इतर मित्रांनी त्याच्यासाठी लिहिलेलं 'Shine on you crazy diamond' किंवा स्वत:चा मुलगा गेल्यावर Eric Clapton ने लिहिलेलं 'Tears in Heaven' ऐकताना सुन्न व्हायला होतं. Jethro Tull चा Ian Anderson घरदार नसलेल्या रस्त्यावर भटकणाऱ्या माणसाबद्दल 'Aqualung' सारख्या गाण्यातून आपुलकीने बोलतो तेव्हा, जेरुसलेम पुन्हा एकदा शांत व्हावं असं Don Mclean कळकळीने सांगतो तेव्हा ही लोकं कुठेतरी आपल्या मनातलंच बोलताहेत असं वाटत राहतं. अभ्यास करताना अत्यंत कंटाळा येतो तेव्हा, सगळं शिक्षण खोटंय असं वाटत असताना Floyd चं "We don't need no education...All in all you are just another brick in the wall" ऐकणं अपरिहार्य होऊन बसतं. इथे IIT मधे संध्याकाळच्या वेळी होस्टेल्स मधे एकत्र येऊन, आपापल्या Guitars, Synth घेऊन संगीतातील नवशिके गाणी म्हणतात तेव्हा Dire Straits च्या 'Sultans of Swing' ची आठवण झाल्याशिवाय रहात नाही. कोकेनला मी हात लावलेला नाही, पण त्याची धुंदी मी Clapton च्या 'Cocain' सारख्या गाण्यातून अनुभवतो. मागे 'हजारों ख्वाहिशें ऐसी' या चित्रपटातील 'मन ये बावरा' हे गाणं आणि त्यावेळच्या माझ्या मन:स्थितीबद्दल मी लिहिलं होतं. आयुष्यात येणाऱ्या रोजच्या अनुभवांना मी कुठेतरी या संगीताशी Relate करत आलोय. बैठक मारून काहीतरी चांगलं ऐकू असं ठरवून ऐकलेलं संगीत वेगळं आणि ते असं सहज ऐकावसं वाटणारं वेगळं. संगीतातील जो सहजपणा मला अपेक्षित आहे तो हा. आणखीन एक गोष्ट. केवळ हलक्याफुलक्या चाली किंवा सोपे शब्द जोडून बनवलेलं संगीत हे श्रवणीय असेल पण सहज वाटेलंच असं नाही.
जुनी हिंदी गाणी मला आवडतात. पण वर्षानुवर्षं आपल्याकडचं चित्रपटसंगीत हे 'प्रेम' या एकाच भावनेत अडकत आलंय याचं मला वाईट वाटतं. अपवाद असतील, पण ते अपवाद आहेत हे महत्त्वाचं. Indian Ocean सारख्या संपूर्णपणे वेगळं संगीत देणाऱ्या Bandचं मला कौतुक वाटतं ते यामुळेच.
शास्त्रीय संगीताच्या बाबतीत माझ्या मनात कोणतीही अढी नाही. बाबांना शास्त्रीय संगीताचं खूप वेड आहे. लहानपणापासून माझ्या कानावर शास्त्रीय संगीत पडत आलंय. सवाईगंधर्व सारख्या कार्यक्रमांनाही मी जातो. पण संगीतातील जो सहजपणा मला अपेक्षित आहे, तो शास्त्रीय संगीतात आहे का, याबद्दल मी आजही साशंक आहे.
संगीता म्हणतात, तसं कोणताही पूर्वग्रह न ठेवता इतर गोष्टींकडे पाहिलं पाहिजे. अगदी मान्य. मीदेखील नवीन गोष्टी शिकण्याचा, समजून घेण्याचा प्रयत्न करतोच आहे. संगीताच्या बाबतीतील माझी मतं ठाम आणि न बदलणारी आहेत असला माझा अट्टाहासही नाही. काळानुरूप आपल्या आवडी-निवडी बदलत जातात. काही गोष्टी जास्त जवळच्या वाटू लागतात. त्यामुळे इथून पुढे काय आवडेल किंवा नाही हे मी सांगू शकत नाही. पण आज मला जे संगीत सर्वात जवळचं वाटतं आणि जे तितकसं जवळचं वाटत नाही याबद्दलची माझी मतं स्पष्ट आहेत. ही गोष्ट मी नाकारू शकत नाही.
प्रायोगिक रंगभूमीविषयी थोडंसं -
ओंकार गोवर्धन (उर्फ गोव्या) हा माझा मित्र. मराठी रंगभूमीवर काम करणारा एक कलाकार. गेली अनेक वर्षं अनेक नाटकांतून तो स्वत: काम करतो आहे आणि अनेक संस्थांशी निगडित आहे. त्याच्यामुळे अनेक प्रायोगिक नाटकं पाहण्याचा योग येतो. गेल्या काही दिवसांत महाराष्ट्र कल्चरल सेंटरचे एका 'छोट्याश्या सुट्टीत' तर आसक्त पुणे या संस्थेची 'फ्रिजमधे ठेवलेले प्रेम','तू' आणि 'पूर्णविराम' ही नाटके पाहिली. यातील 'एका छोट्याश्या सुट्टीत' हे नाटक फारच आवडलं. नाटकाची संकल्पना वेगळी आणि छान आहे. 'फ्रिजमधे ठेवलेलं प्रेम' आणि 'तू' ही नाटकं मात्र फारच क्लिष्ट वाटली. लेखकाला नक्की काय सांगायचंय ते नीट कळतंच नाही. 'पूर्णविराम' चांगलं वाटलं पण त्यातही काही गोष्टी अर्धवट ठेवल्यासारख्या वाटल्या आणि थोडी निराशाच झाली. मुळात जगातलं कितीही मोठं तत्त्व हे अगदी सहज आणि सोप्या प्रकारे दाखवता येतं यावर माझा विश्वास आहे. गोष्टी उगाचच अवघड करून सांगितल्या तर त्या नकोशा वाटायला लागतात.
माझं मत मी गोव्याला स्पष्टपणे सांगितलं. त्यावर तो म्हणाला, " व्यावसायिक रंगभूमीवर एखादं नाटक करताना खूप मर्यादा येतात. तिथे लोकांना सगळं समजेल असं छान छान असंच दाखवावं लागतं. प्रायोगिक रंगभूमी ही आपल्यासाठी आहे. आपल्याला हवं तसं वेगळं काहीतरी करायची संधी प्रायोगिक नाटकांतूनच मिळते. शेवटी अशी नाटकं करणं हा देखील एक प्रयोगच आहे. यातून काहीतरी वेगळं लोकांना मिळावं हाच प्रयत्न आहे. ही नाटकं आवडो अगर न आवडो आपण ती पाहायला हवीत."
त्याचं हे म्हणणं मात्र मला पटतं. या नाटकांमधील वेगळेपण जाणवत राहतं. सुंदर अभिनय हा त्यातला एक मुद्दा. दिग्दर्शनातही एक प्रकारचं नाविन्य आहे. ही नाटकं पाहताना आपण काहीतरी वेगळं पूर्वी न पाहिलेलं पाहतोय असं वाटत राहतं.
रंगभूमीसाठी ही मंडळी खरोखर खूप कष्ट घेतात आणि त्याबद्दल मला त्यांचा खरोखर आदर वाटतो. अशाच प्रयत्नांतूनच 'माकडाच्या हाती शॅम्पेन' सारखं वेगळं आणि चांगलं प्रायोगिक नाटक व्यावसायिक रंगभूमीवर येतं. छोट्याश्या सुट्टीत सारखी नाटकं इथेच पाहायला मिळतात.
गोव्या म्हणतो तसं आपण स्वत: ही नाटकं निदान पाहायला हवीत. दूरदर्शनवरील फालतू मालिकांत रमणाऱ्या घरातील मंडळींना कधीतरी रंगमंचाकडे वळवलं पाहिजे. शाहरूख खान हा चांगला अभिनय करतो, इतपतच ज्यांची अभिनयाची अनुभूती मर्यादित राहिली आहे, अशा आपल्या मित्रमंडळींना आपण अभिनय म्हणजे काय हे दाखवण्यासाठी अशा नाटकांना घेऊन जाऊ शकता. :)
प्रायोगिक रंगभूमी टिकवणे ही रसिकांची जबाबदारी आहे. पण त्याचबरोबर नाटककारांनी, दिग्दर्शकांनी उगीचच काहीतरी क्लिष्ट दाखवून आपण काहीतरी जगावेगळं करतोय या भ्रमात राहू नये. मुळात प्रेक्षक आणि नाटककार-दिग्दर्शक यांमधे मोकळेपणाने संवाद व्हायला हवा. नाटक आवडलं , न आवडलं याबाबत मोकळेपणाने चर्चा व्हायला हवी. काहीतरी वेगळं पाहण्याची इच्छा असलेले माझ्यासारखे रसिक आणि काहीतरी वेगळं देण्याची इच्छा असलेले नाटककार यांमधे फार अंतर असता कामा नये. :) प्रायोगिक रंगभूमी टिकवण्यासाठी या गोष्टींची खूप गरज आहे, हे माझं प्रामाणिक मत.
नंदा प्रधान
"जगात काहीच नाही! ज्या क्षणाला आपण श्वास घेत असतो ना, तेवढा क्षण असतो...जीवन जीवन ज्याला म्हणतात ना, ते आपल्या जन्मापासून मरणापर्यंत नुसतं असं आड येत असतं. बाकी काही नसतं! कधी प्रचंड लाटा होऊन येतं. वादळ होऊन येतं. कधी उगीचच मठ्ठपणानं आडवं पडून राहतं. मग कंटाळा येऊ नये म्हणून आपण त्याला लेबलं लावतो - प्रेम म्हणतो, बायको म्हणतो, आई म्हणतो, धर्म म्हणतो, देव म्हणतो-काय वाट्टेल ते म्हणतो. एरवी जीवन म्हणजे एक निरर्थक फसवी अशी वस्तू आहे."
पुलंच्या नंदा प्रधानचे हे शब्द.
नंदा प्रधान आज पहिल्यांदा वाचला आणि अंतर्बाह्य हललो. इतक्या प्रसंगातून गेलेल्या ह्या माणसाचा तो कोरडेपणा, ते तुटक बोलणं अंगावर येतं अगदी.
नंदा प्रधान वाचायला घेतलं आणि लक्षात आलं की, दुपारच्या वर्गाची वेळ झालीये. मित्र बोलवायला आला. मी गेलो नाही. थोड्या वेळाने त्याचा SMS आला. "Surprise test आहे. लगेच नीघ." मी गेलो नाही. नंदा प्रधान असा अर्धवट सोडणं शक्य नव्हतं. या माणसाने जे वादळ उडवून दिलंय ते कधी शांत होईल कोणास ठाऊक?
मन ये बावरा
"बावरा मन देखने चला एक सपना
बावरेसे मन की देखो बावरी है बातें
बावरीसी धडकनें है बावरी है साँसे
बावरीसी करवटोंसे निंदिया क्यों भागे
बावरेसे नैन चाहे बावरे झरोखोंसे बावरे नजारोंको तकना
बावरा मन देखने चला एक सपना"
म्हटलं तर आयुष्य किती सोप्पं आहे. नोकरी करावी, संसार करावा, छंद जोपासावेत, गप्पा मारायला चार मित्र जवळ असावेत. आपण कोणाच्या अध्यात ना मध्यात. जगाचं काही का होऊ देत आपण आपलं पहावं आणि आनंदात रहावं.
यात चूक काय आहे? काहीच नाही.
पण हे असले विचार मनाला पटत नाहीत. उगाचंच कासावीस व्हायला होतं.
मुळातच समाज ही संकल्पना माझ्यासाठी महत्त्वाची आहे. आपण जे काही आहोत, जे काही करतो आहोत त्यातून आजूबाजूच्या चार लोकांना काहीतरी मिळालं पाहिजे ही त्यामागची भावना. त्याचप्रमाणे इतरांकडून काही गोष्टींची अपेक्षा ठेवणे आणि त्या न मिळाल्यास चीड येणं हेदेखील तितकंच स्वाभावीक....या गोष्टी मनाच्या कोपऱ्यात कुठेतरी होत्याच पण आत्तापर्यंत त्या तितक्या प्रकर्षाने समोर आल्या नव्हत्या आणि त्यावर तितका सखोल विचारही झाला नव्हता.
काही दिवसांपूर्वी तापत असलेल्या आरक्षणाविरुध्दच्या आंदोलनात मी नकळत ओढला गेलो. मोर्च्यांमधे भाग घेतला, त्यानिमित्ताने नवीन लोकांच्या ओळखी झाल्या. Meetings ना गेलो, काही गोष्टींचं Planning केलं, पुण्यातील एका मोर्च्यात स्वत:ला अटक करवून घेतली. नंतर पोलिस स्टेशन पाहण्याचा योग आला, कोर्टाची पायरी चढण्याचा योग आला.
त्यानंतरही सर्व प्रकारचे प्रयत्न चालूच होते. त्यात प्रत्यक्ष राष्ट्रपतींना भेटून त्यांच्याशी बोलण्याची संधी मिळाली. सगळं झालं.
अनेक नव्या गोष्टी कळल्या. Dedication ने कामं करणारी लोकं भेटली, भरपूर गप्पा मारणारी आणि वेळ आली की पळून जाणारी लोकंही भेटली. त्याउलट "मला राजकारणात जायचंय आणि I'm serious about it" असं मनापासून सांगणारे तरुण भेटले. काही मतलबी लोकं भेटली. स्वत:चा स्वार्थ डोळ्यासमोर ठेवून येणारी लोकं भेटली. वादविवाद झाले. प्रसंगी भांडणेही. एकंदरीतच हा अनुभव खूप वेगळा होता.
या सगळ्या प्रकारात उत्साहाचे क्षण होते तसेच नैराश्याचेही. अनेक लोकांबरोबर झालेल्या ओळखी, वृत्तपत्रांच्या ऑफिसात घातलेल्या खेपा, पोलिस स्टेशन, कोर्ट यांचे अनुभव, वकीलांचा अनुभव या सगळ्यांमुळे बऱ्याच गोष्टी खूप जवळून पाहायला मिळाल्या. आजूबाजूच्या गोष्टी पाहून बऱ्याचदा त्रासच झाला. घरात बसून तमाशा पाहणं मला कधीच पटलं नाही पण एखादी गोष्ट मिळवण्यासाठी रस्त्यावर उतरणंही तितकं सोपं नाहीये याची जाणीव झाली.
स्वत:च्याच नादात असलेल्या मला अचानक आजूबाजूच्या समाजाचं भान आलंय. मला हे मान्य करावंच लागेल की आता माझा उत्साह बराच ओसरलाय. अनेक नवे प्रश्न उभे राहिलेत. आपल्याला नक्की काय हवंय हे कळेनासं झालंय. सध्या हातात एकच गोष्ट आहे..या प्रश्नांची शांतपणे उत्तरं शोधणं. माझं वाचन फारच कमी आहे. आपल्याला खूप जास्त वाचायला हवंय याची प्रकर्षाने जाणीव झालीये. यातून काही प्रश्न सुटतील असं वाटतंय.
"हजारों ख्वाहिशें ऐसि" मधलं हे गाणं आजकाल मी पुन्हापुन्हा ऐकतो. गाण्याचा भावार्थ माझ्या मन:स्थितीशी अगदी मिळताजुळता आहे..
"बावरा मन देखने चला एक सपना"